श्री हनुमान स्तुती | Shri Hanuman Stuti |
|| श्री हनुमान स्तुती || महारुद्र अवतार हा सूर्यवंशी | अनादिनाथ पूर्ण तारावयासी || असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||१|| तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे | किती भाग्य वर्णू तया अंजनीचे || तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||२|| गिळायासी जाता तया भास्करासी | तिथे राहु तो येउनी त्याजपासी || तया चंडकीर्णा मारिता तो पळाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||३|| खरा ब्रह्मचारी मनाते विचारी | म्हणोनी तया भेटला रावणारी || दयासागारू भक्तीने गौरविला | नमस्कार माझा तया मारुतीला ||४|| सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा | धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा || गिरी आणुनी शीघ्र तो उठविला | नमस्कार माझा तया मारुतीला ||५|| जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी | समस्तांपुढे तापसी निर्विकारी || नमू जावया लागी रे मोक्षपंथा | नमस्कार माझा तुम्हा हनुमंता ||६||